Police Recruitment | बारामती, (पुणे) : जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बसलेला.. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कायमच वंचित राहिलेला पारधी समाज.. सर्वसामान्य पांढरपेशा समाजाच्या नजरेत उपेक्षित असलेल्या या समाजातील सारिका घुंगरू भोसले या महिलेने जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सरावातील सातत्याच्या जोरावर पुणे जिल्ह्यातील पारधी समाजातून महिला पोलीस होण्याचा मान मिळवला आहे.
करंजे- देऊळवाडी (ता. बारामती) येथील वंचित पारधी समाजातील सारिका घुंगरू भोसले असे तिचे नाव आहे. पोलिस दलात भरती होत इतर महिलांसाठी प्रेरणादायी बनली आहे. सारिकाने अतिशय खडतर प्रवास करत हे यश मिळविले आहे.
देऊळवाडीतील सारिका राजेंद्र काळे हिने सोमेश्वर विद्यालय करंजे येथे सहावीपर्यंत शिक्षण घेतले. तिचे घुंगरू भोसले याच्याशी लग्न झाले आणि शिक्षण तुटले. तिची धाकटी बहीण संगीता मात्र आईवडिलांच्या प्रेरणेने बारावीपर्यंत शिकली आणि पोलिस दलात जाऊन पोचली. तिला शिक्षणाची ओढ वाटू लागली. ती दोन मुलांची आई होती.
तरीही तिने दहा वर्षांच्या खंडानंतर दहावीला सतरा क्रमांकाचा फॉर्म भरला आणि जिद्दीने यश मिळविले. महाविद्यालयातून बारावीला ५६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. नुकतीच नाशिक येथे विद्यापीठात मान्यवरांनी आवर्जून तिची मुलाखत घेत गोल्ड मेडल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह प्रदान केले.
इतिहास विषयात गोल्ड मेडल…
सहावीतून शाळा सोडल्यावर तिचे लग्न झाले. दोन मुले झाली. सारिकाची धाकटी बहीण संगिता ही ठाणे पोलिस दलात भरती झाली. तिची प्रेरणा घेत सारिकाने १० वर्षांच्या खंडानंतर थेट दहावीची परीक्षा दिली. काकडे महाविद्यालयात बारावी पूर्ण करून तिने नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि इतिहास विषयात गोल्ड मेडल मिळविले. तिच्या यशाची कहाणी वंचितच नव्हे तर समस्त महिलावर्गासाठी प्रेरणादायी आहे.
सारिकाची पुणे शहर पोलीस दलात नुकतीच निवड झाली. यंदाच्या भरतीत ११० गुण मिळवून सारिका शहर पोलीस दलात भरती झाली मागील पोलीस भरती मैदानी चाचणीला कमी गुण मिळाल्यामुळे ती भरती होऊ शकली नाही मात्र या वर्षी तिने जिद्दीच्या बळावर यश संपादन केले. मागील २ वर्षापासून ती विवेकानंद अभ्यासिकेचे संचालक गणेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करत होती.
दरम्यान, या प्रवासात तिला तिचे पती घुंगरू भोसले यांची मोलाची मदत झाली आहे. त्यांच्या सहकाऱ्याने हे यश संपादन केले असल्याचे प्रतिक्रिया सारिका भोसले यांनी दिली. वास्तविक राज्यात पारधी समाज हा अजूनही वंचित समाज म्हणूनच ओळखला जातो मात्र काळाप्रमाणे समाज बदलत असून सारिका सारख्या अनेक महिला आणि मुले पोलिस भरती होत इतरांसाठी आदर्श बनत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Rahul Kul : संजय राऊतांनी केलेले आरोप आमदार कुल यांनी फेटाळले ; पाहा काय दिली प्रतिक्रिया