लोणी कंद : पेरणे येथील बेकायदा हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट ६ व लोणीकंद पोलीसांनी सोमवारी (ता.८) धाड टाकली. या छाप्यात पोलिसांनी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या रसायनासह मुद्देमाल जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केला आहे. तर एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलम बजरंग परदेशी (वय-30, रा.पेरणे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे यांना पेरणे गावच्या हद्दीतील डोंगरगाव रस्त्यावर असलेल्या मौलाई चौकाच्या परिसरात एक महिला हातभट्टी दारू तयार करीत आहे, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी लोणी कंद पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. तेव्हा सदर ठिकाणी महिला हातभट्टी दारू बनविताना आढळून आली. याप्रकरणी नीलम परदेशी यांच्यावर लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक सहाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश मेमाने, संभाजी सकटे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, शेखर काटे, ज्योती काळे, नितीन धाडगे तसेच लोणीकंद तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, तीकोणे, जगताप, अमोल ढोने, मल्हारी सापुरे, साईनाथ रोकडे, जॉन तुपारे, दत्ता गावडे यांच्या पथकाने केली आहे.