पुणे : बारामती तालुक्यातील सांगवी येथे जमिनीच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ही घटना १२ एप्रिल २०२३ रोजी घडली होती. या खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर संबंधित पुणे पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिले आहेत. विक्रम गणपत फडतरे असे बडतर्फ केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
विक्रम फडतरे हा बारामती तालुक्यातील सांगवी येथील रहिवाशी असून तो पुणे पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे. गावातील वडीलोपार्जित जमीनीवरून त्याचे भावकीसमवेद वाद झाले होते. त्या वादातून १२ एप्रिल २०२३ रोजी विक्रम याचा भाऊ विशाल फडतरे याने त्यांचा नातेवाईक विनोद हिराचंद फडतरे याचा दगडाने ठेचून खून केला होता.
या गुन्ह्यात पोलिस कर्मचारी विक्रम फडतरेचा भाऊ विशाल हा मुख्य आरोपी आहे. तर त्याच्यासह पोलीस कर्मचारी विक्रम फडतरे आणि त्याचे वडील गणपत फडतरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी विक्रम फडतरे याला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो येरवडा कारागृहात आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी पोलिस कर्मचारी विक्रम फडतरे याची विभागीय चौकशी केली असता त्याने वडील व भावासोबत विनोद फडतरे याच्या खुनाच्या कटात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच फडतरेचे कृत्य पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे असून पोलिस दलाच्या शिस्तीला बाधा आणणारे आहे, असे नमूद करून अतिरिक्त पोलिस आयुक्त चावरिया यांनी फडतरेला पोलिस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.