पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात शुक्रवारी सायंकाळी जोरदार राडा झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे, विद्यापीठातील ललित कला केंद्रात तोडफोड प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांवर पुण्यातील चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यापीठातील ललित कला केंद्रात विभागाच्या परीक्षा अभ्यासी नाट्यप्रयोगाचे आयोजनक करण्यात आले होते. यामध्ये ‘जब वी मेट’ ह्या नाटकाच्या प्रयोगामध्ये रामायणातील पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत काही विद्यार्थी संघटनांनी गोंधळ घालत प्रयोग बंद पाडला. अभाविपच्या काही बाहेरील आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी राडा घालत प्रयोग बंद पाडला. तोडफोड देखील करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा शनिवारी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामचा नारा देत विद्यापीठात तोडफोड करण्यात आली.
ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेश राजेंद्र नावच्या विद्यार्थ्याने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. मात्र, या नाटकातील संवादावर आक्षेप घेत नाटकाचा प्रयोग उधळून लावण्यात आला. या वेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली.
या राड्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा तोडफोड करण्यात आली, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.