पुणे : माल वाहतूक करणाऱ्या प्रत्येक गाडीमागे १ हजार रुपये प्रमाणे लाचेची मागणी करून, त्यातील पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बावधन वाहतुक विभागातील पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बावधान वाहतूक पोलीस चौकीसमोर बुधवारी (ता.२६) केली आहे.
समाधान बालचंद लोखंडे (वय ३९, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे, वर्ग-३) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा उत्खनन केलेली माती व इतर मटेरीअल ने-आण करण्यासाठी माल वाहतुक गाडयांचा व्यवसाय आहे. तर आरोपी समाधान लोखंडे हे बावधन वाहतूक विभागात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. समाधान लोखंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे उत्खननातील माती वाहून नेणाऱ्या वाहनांची विना कारवाई वाहतूक सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक गाडीला १ हजार रुपये प्रमाणे ५ गाड्यांची ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्याकडून लोकसेवक पोलीस नाईक समाधान लोखंडे यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने करीत आहेत.