पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील रेस्टॉरंट चालवणाऱ्या विक्रांत सिंग यांनी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री अकरा साडेअकरा वाजता नेहमीप्रमाणे रेस्टॉरंट बंद केल्यानंतर सर्वजण झोपण्याच्या तयारीत होते. त्यावेळी मध्यरात्री एकच्या सुमारास आठ ते दहा जणांचे टोळके त्या ठिकाणी आले आणि त्यांनी चुकीची ऑर्डर दिल्याच्या रागातून हॉटेल स्टाफला मारहाण करायला सुरुवात केली.
टोळक्याच्या तावडीतून वाचण्यासाठी कर्मचारी पळून जाऊ लागला. त्यावेळी आरोपींनी त्याचा पाठलाग करुन रस्त्यावर बेदम मारहाण केली. त्याच्यावर दगडफेक देखील केल्याचा आरोप विक्रांत सिंग यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. त्यानंतर पोलिसांना या संदर्भात माहिती कळवण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या भारती विद्यापीठ पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
मात्र, त्यानंतर पोलिसांनी या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडेच पैशांची मागणी केल्याचा आरोप विक्रांत सिंग यांनी केला आहे. कायद्याचे रक्षक असलेले पोलिसच जर भक्षक बनू पाहत असतील, तर शहरातील व्यापाऱ्यांची सुरक्षा कोणाच्या भरवशावर आहे, असा सवाल त्यांनी केला. केवळ राजकीय नेत्यांची सुरक्षा करण्यात मग्न असलेल्या पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायला पाहिजे असे देखील ते म्हणाले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.