लोणी काळभोर, (पुणे) : शिक्षण आणि आरोग्य हे मानवाचा विकास तसेच समाजाची गुणवत्ता यांचे सर्वात मोठे बोधचिन्ह आहे. शिक्षण जितके प्रगत होईल आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जेवढ्या सहजपणे पोहोचेल, तो समाज तेवढाच प्रगत आणि विकसित बनेल. त्यामुळे आजचे विद्यार्थी निरोगी असतील तरच पुढे राष्ट्र लवकर प्रगत बनणार आहे. असे प्रतिपादन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या प्रशालेत आरोग्य तपासणी शिबिराचे शुक्रवारी (ता. १६) आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण बोलत होते. यावेळी पुणे आर्म्स फोर्स मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्या कर्नल अरुणा के आर, लेफ्टनंट कर्नल तनु जदली, मेजर ज्योती, कन्या प्रशाळेच्या मुख्याध्यापिका निशा झिंजुरके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना शशिकांत चव्हाण म्हणाले, विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्यांच्या प्रगतीवर राष्ट्राची व समाजाची प्रगती अवलंबून असते. विद्यार्थ्यांचे आरोग्य जेवढे चांगले राहिले, तेवढेच पुढील जीवन सुखमय आणि दृढ होईल. तसेच विद्यार्थिनींना जर कोण त्रास देत असेल तर मला त्वरित कळवा. मी त्याच्यावर कडक कारवाई करेल. असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना अरुणा के. आर. म्हणाल्या की, मासिक पाळी मध्ये आधुनिक साधनांचा उपयोग करावा. अंगावर जर जास्त रक्त जात असेल त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या पाच दिवसात हलका आहार घ्यावा व थोडासा व्यायामही केल्यास आपल्याला बरे वाटते. वेलची, मोरवळा, बेलाचा काढा गरजेनुसार घेतल्यास आपल्याला बरे वाटेल.
दरम्यान, आर्म्स फोर्स मेडिकल कॉलेजच्या ३१ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. व्यायाम, आहार, स्वच्छता या संदर्भात फलक लावून विद्यार्थ्यांना त्याचे महत्व पटवून देण्यात आले. डासांपासून होणाऱ्या आजारांची माहिती दिली. यावेळी कन्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी निरोगी आरोग्याचा निर्धार केला आहे.
यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभाग प्रमुख रामदास मेमाणे, कन्या शाळेचे उप मुख्याध्यापक दिलीपकुमार सूर्यवंशी, पांडुरंग पाटील, सतीश कदम, प्रियांका पाटील, उषा चौधरी, मोहन वीरकर, मीरा किलचे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.