उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) बाजारतळ येथील ओढ्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या आडोशाला सुरु असलेल्या खुलेआम मटका जुगाराच्या अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांनी शनिवारी (ता.8) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून सुमारे 4 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गणेश शांताराम कांचन (रा.उरुळीकांचन ता. हवेली जि पुणे) व सुधीर सुरेश बोंबरे (वय 34 धंदा मजुरी रा.तुपेवस्ती उरुळीकांचन ता हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अश्वजित विनोद मोहोड यांनी सरकारच्या वतीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन बाजारतळ येथील ओढ्याच्या परिसरात असलेल्या झाडाच्या आडोशाला खुलेआम मटका जुगार सुरु आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
तेव्हा सुधीर बोंबरे हा ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळ खेळवीत असताना जागीच दिसून आला आहे. तसेच गणेश कांचन याच्या सांगण्यावरून हा जुगार अड्डा चालवीत असल्याचे बोंबरे यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या कारवाईत मटका जुगार खेळविण्याचे साहित्य व रोख रक्कम असा 4610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गणेश कांचन व सुधीर बोंबरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार होले करीत आहेत.