पुणे : पुण्याची ओळख विद्येचे माहेरघर अशी आहे. येथे हुक्का पार्लर, पब संस्कृती बोकाळत आहे. पुण्यात पब संस्कृतीमुळे ड्रग्जचा महापूर वाहतोय, ही निंदनीय बाब आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटमुळे पुण्याची ओळख उडता पंजाबसारखी होत आहे. येथे चार हजार कोटींचे ड्रग्स सापडणे म्हणजे पुणे पोलिसांचे अपयश आहे. या घटनेवरूनच हेच स्पष्ट होते की, पुण्यात अनेक ललित पाटील कार्यरत आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी यांनी केला आहे.
पुणे जिल्ह्यात ड्रग्स बनवण्याचा कारखाना आढळला. ललित पाटील प्रकरणाचा तपास सरकारने पूर्ण केला नाही. सरकारने संजीव ठाकूर यांना पाठीशी घालून कोणतीही कारवाई त्यांच्यावर केली नाही. ललित पाटील प्रकरणाच्या वेळी येथे आंतरराष्ट्रीय रॅकेट टोळी कार्यरत असल्याचे सांगितले होते. पुण्यात अनेक ललित पाटील कार्यरत आहेत. पुणे पोलीस आयुक्तांनी पबबाबत निर्णय घेतला. मी दावा करतो की याच पबमध्ये ड्रग्स मिळतात. पब संस्कृती पुण्यात नसावी, हे पुणेकरांचे मत आहे. गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांची एलआयबी काय करतायत, असा आरोप आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला.
ड्रग्स रॅकेटचा ‘मास्टरमाईंड’ मूळचा पंजाबमधील आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी तो इंग्लंडमध्ये स्थाईक आहे. २०१६ मधील कुरकुंभ येथे मारलेल्या छाप्यात त्याला पकडण्यात आले होते. यावेळी ३५० किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि या प्रकरणात तो कारागृहात शिक्षा भोगत होता. कारागृहात शिक्षा भोगत असताना ‘मास्टरमाईंड’ची वैभव माने आणि हैदर शेख याच्याशी ओळख झाली आणि या ड्रग्स प्रकरणाला सुरुवात झाली.
दरम्यान, मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी टोळीने टोपण नावाने कोडवर्ड तयार केल्याची माहिती नुकतीच उजेडात आली आहे. आरोपींचा मोबाइल डेटा रिकव्हर केल्यानंतर गुन्हे शाखेला कोडिंगची उकल करण्यात पोलिसांना यश आले.