पुणे : पुण्यातील सराईत गुंड गजा ऊर्फ गजानन मारणेचे रिल्सद्वारे उदात्तीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींना पोलिस आयुक्तालयात हजेरी लावण्यास सांगून रिल्स डिलीट करण्यास लावले आहे. तसेच, जो कोणी शहरात गुंडगिरी करत असेल, गुंडांचे रिल्सद्वारे उदात्तीकरण करत असेल, अशांना कायदेशीर कारवाईला सामोरे जाऊ लागेल, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.
नेमक प्रकरण काय?
गजा ऊर्फ गजानन नावाने इस्टाग्रामवर रिल्स व्हायरल करत उदात्तीकरण करणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथक एकने चांगलाच दणका दिला. दोघांना बोलावून घेत विविध सोशल मीडियाच्या अकाउंटवरील ५० रिल्स डिलीट करून घेण्यात आले. तसेच पुन्हा असे करणार नसल्याची हमी त्यांच्याकडून घेतली आहे. सूरज काकडे (रा. हांडेवाडी) आणि सोमनाथ ऊर्फ पप्पू रामचंद्र मोरे अशी कानउघाडणी केलेल्यां दोघांची नावे आहेत.
फेसबुकसह इन्स्टाग्रामवर दहशतीचे किंवा गुन्हेगारांचे रिल्स खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. शस्त्राचा वापर करून व्हिडीओ करणे, सराईत गुंडासह टोळीप्रमुखांना आदर्श मानत सोशल मीडियावर दबंगगिरी करणा-याविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली आहे.
सोशल मीडियावरील हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष
व्हिडीओद्वारे फिल्मीस्टाईल दमदाटी करणे, नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे, सराईतांचे उदात्तीकरण करणा-यांचे इन्स्टाग्राम, फेसबुकवरील व्हिडीओ शोधण्यास गुन्हे शाखेने सुरुवात केली आहे. संबंधितांना बोलावून घेत फैलावर घेण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे शस्त्राचे प्रदर्शन करणे, गुंडगिरीला प्रेरित होऊन त्यांचे व्हिडीओ व्हायरल करणा-यांवर कारवाई करण्यात येणार आहे. एवढंच नाही तर सराईत टोळ्यांच्या सोशल मीडिया हालचालींवरही बारीक लक्ष ठेवले जात असल्याचा इशारा आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.