पुणे : वाहनांच्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना पुणे शहरात वरंवार घडत आहेत. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी असा गोंधळ घालणाऱ्या गुंडांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी विशेष मोहिम सुरु केली असल्याचे ते म्हणाले.
पुणे पोलीस गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने साडेतीन कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी पोलीस आयुक्तांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहरात तीन ते चार गाड्यांची तोडफोड किंवा पेटवण्याच्या घटना घडल्या आहेत. हा प्रकार पुणे पोलिसांनी गांभीर्याने घेतला आहे. आरोपींचे रेकॉर्ड पाहून त्यांच्यावर एन.पी.डी.ए अंतर्गत कारवाई प्रस्तावीत आहे. गाडी जाळण्याचे जे हॉटस्पॉट आहेत. त्यातील आरोपींची ओळख पटवून व रस्त्यावर धुमाकूळ घालणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.
नागरिकांशी चांगले वागणे प्राथमिकता
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आलेल्या नागरिकांना पोलिसांकडून योग्य वागणूक मिळत नाही, याबाबत अनेक तक्रारी असतात. अशी विचारणा केली असता पोलीस आयुक्त म्हणाले, याबाबत आम्ही पूर्णपणे संवेदनशील आहोत. येत्या काही दिवसांमध्ये हे चित्र बदलले दिसेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. तसेच कर्मचारी, अधिकारी हे लोकांशी चांगले बोलून त्यांना चांगली वागणूक देतील व त्यांच्या अडचणी सोडवतील, ही आमची प्राथमिकता असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.