-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुर एसटी स्टँडच्या बाहेर न्हावरे येथे घरी जाण्यासाठी पत्नीसह खाजगी वाहनाची वाट पाहणाऱ्या पत्रकाराला दारूच्या नशेत धुंद तरुणाने लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी पत्रकार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
दत्तात्रय मारुती कारंडे, (वय -45, रा. न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. संतोष सोमवंशी (वय- 33 वर्ष रा. भाजी बाजार शिरूर ता. शिरूर जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे, गुरुवारी (दि. 12 सप्टेंबर) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास शिरूर एसटी बस स्टॉपच्या समोरील पुलाजवळ फिर्यादी पत्रकार दत्तात्रय कारंडे व त्यांची पत्नी आशा हे हॉस्पिटलमध्ये औषध उपचार करण्यास गेले होते. त्यावेळी न्हावरे येथे घरी जाण्यासाठी खाजगी वाहनाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी एक अनोळखी तरुण नाव पत्ता माहित नाही. तो दारू पिल्याच्या अवस्थेत फिर्यादीच्या जवळ आला व शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास तू आम्हाला शिवीगाळ का करतोस असे विचारले असता, त्याने जवळच उभी असलेले रिक्षा मधून लोखंडी रॉड काढून फिर्यादीच्या उजव्या हातावर मारून उजव्या हाताचे करंगळी बोट फ्रॅक्चर करून दुखापत केली.
पत्नी आशा हीस धक्काबुक्की करून दोघांना शिवीगाळ दमदाटी करत मोटर सायकल वरून निघून गेला आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन आगलावे करीत आहे.