पुणे : महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेच्या भरोसा सेलने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. स्पा मॅनेजरसह मालक सूरज भरत शाहू (रा. वाशी, ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
विश्रांतवाडीतील धानोरी जकात नाका परिसरात असलेल्या गुडविल स्क्वेअर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या भरोसा सेलला मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी मॅनेजर व मालक असलेल्या शाहूला अटक केली आहे. अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
मसाज सेंटर गुन्हे शाखेच्या रडारवर
शहरातील विविध भागात काही स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसांत बाणेर, विश्रांतवाडीतील कारवाईवरून अधोरेखित झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी आता गुन्हे शाखेने मसाज सेंटरविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हे शाखेकडून बेशिस्त, बेकायदा आणि नियमबाह्य मसाज सेंटरची माहिती संकलित करून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.