अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेतील विद्यार्थिनीच्या पाण्याच्या बॉटलमध्ये विषारी औषध टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, विषबाध झालेल्या मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तीची प्रकृति स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
मात्र, पाण्याच्या बाटलीत विष कुठून आले, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या गंभीर घटनेबाबत राजकीय दबाव असल्यामुळे गुन्हा दाखल होत नसल्याची माहिती आता समोर आली आहे. या प्रकारामुळे शाळेत विद्यार्थी सुरक्षित नसल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यावर बोलण्यास तयार नाहीत. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन गुन्हा दाखल होणे गरजेचे होते. परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा शाळेने व कुटुंबाने दाखल केला नाही. त्यामुळे यावर कोणाचा दबाव तर नाही ना? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
मांडवगण फराटा येथील श्री वाघेशर विद्यालयात शिकणारी मुलगी 15 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. त्यानंतर वर्गात दप्तर ठेवून ती बाहेर गेली. शाळा भरल्यानंतर ती पुन्हा वर्गामध्ये आली आणि तिने आणलेल्या बाटलीतील पाणी पिली. यानंतर तिला खूप त्रास होऊ लागला. यावेळी तिच्या मैत्रिणीने बाटलीचा वास घेतला असता उग्रवास आल्याने तिला शंका आली. त्यांनी ही बाब वर्ग शिक्षकांना सांगितली. वर्ग शिक्षकाने तातडीने विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केले. तिला वेळेत उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले.
डॉक्टरांनी बाटलीतील पाण्याची तपासणी केली असता पाण्यात विषारी औषध असल्याचे निदर्शनास आले. या घडलेल्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुलीच्या पाण्याच्या बाटलीत विषारी औषध कुणी टाकले?
दरम्यान, संबंधित मुलीच्या पाण्याच्या बाटलीत विषारी औषध कोणी टाकले? याचा पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे. त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक किंवा पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. मुलीवर जर विष प्रयोग झाला असेल आणि रुग्णालयात उपचार घेतले असतील तर याबाबत रुग्णालयाने पोलिसांना कळवलेच पाहिजे. रुग्णालयाने ही बाब जर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली नाही, तर ही गंभीर घटना असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही घटना घडून आज चार दिवस उलटले तरीही याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार मांडवगण फराटा पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. नेमकं मुलीच्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमध्ये विषारी औषध आले कुठून, याबाबत सर्वजण गप्प का? तसेच विद्यालय प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे? सदर मुलीचे काही बरे वाईट झाले असते, तर त्याला जबाबदार कोण? हेही महत्त्वाचे आहे.
शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद
वाघेश्वर विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र हे कॅमेरे बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलीस प्रशासन कारवाई करणार का? याकडे संपूर्ण मांडवगण फराटा व पंचक्रोशीचे लक्ष लागून राहिले आहे. या घटनेमुळे या भागात विद्यार्थी सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारची घटना काही दिवसापूर्वी बाभुळसर परिसरात घडली असून हा प्रकार देखील स्थानिकांनी दाबला असल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही घटनेची सखोल चौकशी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी करणे गरजेचे आहे.
हा विषबाधेचा प्रकार खरा असून, आम्ही तातडीने विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करून तिचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले. तर विद्यालयाच्या वतीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. शिरूर पोलिसांना (मांडवगण पोलीस आऊट पोस्ट) या प्रकरणाची सखोल चौकशी करावी याबाबतचे पत्र विद्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे.
रामदास चव्हाण, मुख्याध्यापक-श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशाला मांडवगण फराटा