(Poetry शिरूर – युनूस तांबोळी)
धरणी पडते हरीत करीते
पाऊसाची पहिली ‘सर’ तू
कोणी मेघराजा म्हणे
कुणाचा असे इंद्र देव तू…!
दाटे अंधारी नभावरी
मिलनास तू तयार झाला
पहिला थेंब तो अंगावरी
टप कन आवाज सरसरला
एका मागून एक येऊन
बरसणाऱ्या सरींचा पाऊस बरसला!
कागदी होड्या, लाथडे पाण्याला
चिमुकल्यांचा हर्ष मनाला
चहा बरोबर दिसे कांदा भजी
बैठका,चर्चा मित्र असे सोबतीला…!
विक्रेता म्हणे
ग्राहक येईल खरेदीला
शेतकरी म्हणे
ओल पहातोय पेरणीला
बरस म्हणाव… बरस म्हणाव…
पेरणी, काढणी, मळणी होऊ दे
धनधान्य दे माझ्या शेताला…!
पंढरीत वैष्णवांचा मेळा भरला
हरीनामाचा गजर झाला
बरस म्हणाव… बरस म्हणाव…
पंढरीच्या पांडूरंगा…ये विठ्ठला…
जयहरी विठ्ठल, ज्ञानबा तुकाराम
हर्ष तो नृत्य ते वारकरी मग तल्लीन झाला…!