पुणे : पुणे मेट्रोला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्याने विस्तारित मार्गांचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारीला करण्याचे नियोजन केले होते. मात्र, पंतप्रधानांचा दौरा लांबणीवर पडल्याने उद्घाटन पुढे ढकलले आहे. परिणामी रुबी हॉल ते रामवाडीपर्यंत मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मेट्रोचा वनाज ते रुबी हॉल हा ९.७ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी या मार्गावर वनाज ते गरवारे स्थानकापर्यंत सेवा सुरू होती. नंतर गरवारे ते रुबी हॉल स्थानकापर्यंत सेवेचा विस्तार झाला. याच वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा मार्ग होता. नंतर हा मार्ग फुगेवाडीपासून जिल्हा न्यायालयापर्यंत विस्तारला.
मेट्रो सेवेचा विस्तार गतीने होत आहे. आता वनाज ते रुबी हॉल मार्ग रामवाडीपर्यंत विस्तारण्यात आला आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्याची अंतिम तपासणीही केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे या मेट्रोच्या मार्गाच्या उद्घाटनाची औपचारिकता केवळ शिल्लक आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी १९ फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या हस्ते अनेक विकासकामांची पायाभरणी या दौऱ्यात होईल. यानंतर मोदी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यामुळे मोदींचा पुणे दौरा लांबणीवर पडला असून, मेट्रोच्या उद्घाटनाची मुहूर्तही हुकणार आहे.
दरम्यान, रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाची अंतिम तपासणी केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांनी १९ ते २१ जानेवारी या कालावधीत केली. या तपासणीदरम्यान त्यांनी या मार्गातील काही त्रुटी उपस्थित केल्या. या त्रुटी दूर करून महामेट्रोने त्याचा अहवाल आयुक्तांना पाठविला. त्यानंतर या मार्गाला अंतिम मंजुरी मिळण्याचा मार्ग खुला झाला. मात्र, अद्याप आयुक्तांनी या मार्गाला हिरवा कंदील दिलेला नाही, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.