पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत कायम आस्थापनेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर निर्णय झाला असून संबंधित कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
पीएमआरडीएच्या कायम आस्थापनेवरील सन २०२३-२०२४ या वित्तीय वर्षात कार्यरत असणाऱ्या गट क आणि ड मधील कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याच्या अनुषंगाने २४ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या प्राधिकरण सभेत मान्यता घेण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त प्रती कर्मचारी २८ हजार ८७५ रुपये सानुग्रह अनुदान म्हणून अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मान्यतेने प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुनील पांढरे यांनी यासंबंधी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी आदेश काढले आहेत. त्याबाबत लेखा वित्त विभागाला कळविण्यात आले असून त्या प्रमाणे कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान अदा करण्यात येणार आहे.