लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर आणि परिसरातील नागरिकांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चांगली आणि सुखद बातमी आहे. लोणी काळभोरकरांचा पुण्यापर्यंतचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएपाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजीनगर ते लोणी काळभोर विस्तारित मेट्रो प्रकल्प ‘खासगी भागीदारी तत्त्वावर’ (पीपीपी) की ‘ठेकेदाराची नेमणूक करून’ (ईपीसी) राबविणे योग्य आहे, याची तपासणी करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) आर्थिक तांत्रिक सल्लागार नेमण्यात आला आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली यावर निर्णय घेण्यासाठी पुणे युनिफाइड अर्बन ट्रान्स्पोर्ट अॅथॉरिटीची (पुमटा) बैठक घेण्यात आली आहे.
या बैठकीला पुलगेट ते हडपसर दरम्यान आठ किलोमीटर मार्गाचा तांत्रिक व आर्थिक अहवाल पीएमआरडीए आणि महामेट्रोने स्वतंत्रपणे तयार करावा. त्यात आर्थिकदृष्ट्या कोणाचा प्रकल्प व्यवहार्य आहे. कोणी त्या मार्गाचे काम करावे, यावर निर्णय घेण्यात यावा, असे ठरले होते.
त्यानुसार शिवाजीनगर ते लोणी काळभोर दरम्यान मेट्रोचे विस्तारीकरण कोणत्या पद्धतीने करणे योग्य होईल, याबाबत निर्णय घेण्यासाठी ‘पीएमआरडीए’ ने आर्थिक तांत्रिक सल्लागार नेमावा, अशा सूचना ‘पुमटा’ने दिल्या आहेत. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून सल्लागाराची नेमणूक करण्यात आली, असे ‘पीएमआरडीए’ कडून सांगण्यात आले आहे.
पुणे – शिवाजीनगर न्यायालय ते लोणी काळभोर दरम्यानच्या २१ किलोमीटर लांबीचा मेट्रो प्रकल्पाचा प्रारूप अहवाल दिल्ली मेट्रोकडून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) सादर करण्यात आला होता. त्यानुसार सल्लागाराकडून तीन महिन्यांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला होता. शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी होत होती. त्यामुळे हिंजवडी -शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, पालकमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनपर्यंत दर्शविण्यात आलेला मेट्रो मार्ग लोणी काळभोरपर्यंत वाढविण्यात यावा. दिल्ली मेट्रोने फुरसुंगीपर्यंतच्या सादर केलेल्या अहवाल सुधारित करून तो तातडीने सादर करावा, अशा सूचना पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार शिवाजीनगर-पुलगेट- हडपसर ते लोणी काळभोर हा १९ किलोमीटरचा मार्ग ‘पीएमआरडीए’ने प्रस्तावित केला आहे.