पुणे : उन्हाळाच्या सुट्यांमध्ये सहलींचा आनंद लुटण्यासाठी किफायतशीर दरात पीएमपीएमएलने बससेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार, सार्वजनिक सुद्द्यांच्या व इतर दिवशी पर्यटन बससेवा उपलब्ध असणार आहे. तसेच पर्यटन बससेवेसाठी स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस ही उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवेला हौशी पर्यटक, भाविक-भक्त तसेच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद व पसंती मिळत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पीएमपीएमएलची पर्यटन बससेवा किफायतशीर दरात उपलब्ध असल्याने उन्हाळाच्या सुट्यांमध्ये सहलींचा आनंद पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवेसंगे लुटावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी विविध कार्यालये, कॉलेज, शाळा, औद्योगिक क्षेत्रातील व आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरदारांना साप्ताहिक सुट्टी असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद जास्त असतो. प्रवाशांचा प्रवास आरामदायी सुलभ व माफक दरात होण्याच्या दृष्टीने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता वातानुकूलीत ई-बसेसव्दारे बससेवा सुरू केली आहे.