पुणे : हडपसर परिसरात पीएमपीएमएल चालकाने आपल्याच सहकाऱ्याला मारहाण केली. सुट्टीच्या दिवशी कामावर बोलविल्याचा राग आल्याने या बसचालकाने सहकाऱ्याच्या डोक्यात खुर्चीचा दांडा मारून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीएमपी चालक नंदकुमार बडदे (रा. काळेपडळ, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मयूर सुभाष माने (वय २४, रा. मेट्रो ग्रीन सोसायटी, टिळेकरनगर, कोंढवा) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुट्टीच्या दिवशी माने यांनी बडदे याला कामावर बोलविले होते. त्यामुळे बडदे माने यांच्यावर चिडला होता. हडपसरमधील भेकराईनगर आगारातील कार्यालयात दोघांमध्ये वाद झाले. वादातून बडदेने तुटलेल्या खुर्चीचा लाकडी दांडा माने याच्या डोक्यात मारला. माने यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.