पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे शहरातून रोज पीएमपी ने प्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत. त्या प्रवाशांची रोज प्रवास करताना धावपळ होते. त्यासाठी प्रवाशांची सोय करण्यासाठी शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या ‘पीएमपी’ने पुणेकरांसाठी सोय केली आहे. पुणेकरांचा पीएमपीचा वाढता प्रवास पाहता हा प्रवास अधिक आरामदायी होण्यासाठी आता घरबसल्या ‘पीएमपी’चे तिकीट काढता येणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रवाशांना अॅपवरून तिकीट काढण्याच्या सेवेबरोबरच आणखी दोन ऑनलाइन तिकीट काढण्याचे पर्याय मिळणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून सुचवण्यात आलेल्या दोन कंपन्यांनी पीएमपीसाठी ऑनलाइन तिकीट व बस ट्रॅकिंग यंत्रणा तयार केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रवाशांना घरबसल्या पीएमपीचे तिकीट ऑनलाइन काढणे शक्य होणार आहे.
पीएमपीने प्रवाशांसाठी स्वतः अॅप बनवून त्या माध्यमातून बसची ‘रिअल टाइम’ माहिती देण्याचे काम सुरू केले आहे. या अॅपचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या शेवटच्या काही चाचण्या करणे सध्या सुरू आहे. पीएमपीने प्रवास करणा-या प्रवाशांना अॅपच्या माध्यमातून ज्या बसने जायचे आहे, त्या बसची माहिती घरबसल्या पाहून तिकीट काढता येणार आहे. नागरिकांनी घर बसल्या तिकीट काढल्यानंतर प्रवास करताना केवळ वाहकाला ‘क्यूआर कोड’ दाखवताच तुम्हाला तिकीट मिळेल.
या अॅपवर सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध असणार आहे. तसेच पीएमपीच्या सर्व मार्गांची माहितीदेखील यावर मिळणार आहे. बसचे वेळापत्रक आणि पीएमपीचे विविध पास अॅपद्वारे ऑनलाइन तिकीट काढण्याची सोय आहे. अंतिम चाचण्या झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये हे अॅप सुरू केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
“पीएमपीच्या अॅपबरोबरच दोन खासगी कंपन्यांना पीएमपीचे ऑनलाइन तिकीट काढण्याचे काम देण्यात आले आहे. केंद्र सरकारने नेमून दिलेल्या कंपन्यांकडून ऑनलाइन तिकीट आणि बसच्या ‘लाइव्ह ट्रॅकिंग’ची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्याय मिळणार असल्याची माहिती पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली आहे.