PMP Bus : पुणे : पीएमपीच्या दिवाळीतील उत्पन्नात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा तीन कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मागील २ वर्षाची आकडेवारी हेच सांगत आहे. पीएमपीला २०२१च्या दिवाळीत पाच कोटी ३४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. २०२२ मध्ये ‘पीएमपी’चे दिवाळीतील उत्पन्न सहा कोटी ३५ लाख रुपयांवर गेले.‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या मागील सात दिवसांत ‘पीएमपी’च्या तिजोरीत नऊ कोटी सहा लाख रुपयांची भर पडली आहे. यंदाच्या दिवाळीत ‘पीएमपी’चे उत्पन्न तीन कोटी रुपयांनी वाढले आहे. दिवाळीतही पीएमपीने कंबर कसून काम केल्यामुळे तिजोरीत पैसे आल्याचे दिसत आहे.
गर्दीच्या मार्गावर जादा बस
दिवाळीमध्ये नागरिकांचा नातेवाईकांकडे सण साजरी करण्याकडे जास्त कल असतो. हेच पाहून गर्दीच्या मार्गावर जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, हडपसर, कर्वे आणि पौड रस्ता यांसह अन्य मार्गांवर जादा बस सोडण्यात आल्या. या सात दिवसांत वसुबारस आणि भाऊबीजेला पीएमपीला सर्वाधिक उत्पन्न मिळाले. वसुबारस आणि भाऊबीजेच्या दिवशी अनुक्रमे एक कोटी ५६ लाख रुपये आणि एक कोटी ३९ लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. लक्ष्मीपूजनाला सायंकाळनंतर वर्दळ कमी झाल्याने सर्वांत कमी ९१ लाख रुपये उत्पन्न मिळाले. पीएमपीकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
गेल्या सात दिवसांतील उत्पन्न
९ नोव्हेंबर ~ १.५६ कोटी
१० नोव्हेंबर ~ १.३१ कोटी
११ नोव्हेंबर ~ १.२६ कोटी
१२ नोव्हेंबर ~ ९१.४० लाख
१३ नोव्हेंबर ~ १.३१ कोटी
१४ नोव्हेंबर ~ १.२८ कोटी
१५ नोव्हेंबर ~ १.३९ कोटी