पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ११) पालिकेतील कर्मचारी हे प्रशिक्षणासाठी रवाना झाल्याने पालिकेत शुकशुकाट जाणवत आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांची रेलचेलही कमी झाली आहे. त्यात अधिकारी व कर्मचारी हे निवडणूक प्रशिक्षणासाठी रवाना झाल्याने वर्दळ ही खूपच कमी झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. या दोन्हीसाठी पुणे महानगरपालिकेच्या आठ हजार कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांचे प्रशिक्षण हे गणेश कला केंद्र याठिकाणी सुरू आहे. तर काही कामगारांना जिल्ह्यातीही नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात ही कामगार मंडळी रवाना होणार आहेत.