पुणे : सणासुदीच्या काळात पुणे महानगरपालिकेच्या कामगारांना आनंद लुटता यावा, यासाठी एक गुड न्यूज् आणली आहे. पुणे महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना सणासाठी म्हणून १० हजारांची उचल रक्कम बिनव्याजी दिली जाते. जी दहा समान हप्त्यांत वसूल केली जाते. ही रक्कम आता दुप्पट म्हणजे २० हजार इतकी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. तो निश्चित मान्य केला जाणार आहे.
पुणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सणासाठी उचल म्हणून प्रचलित कार्यपद्धतीनुसार सरसकट १० हजार रुपये प्रतिवर्षी अदा करून प्रचलित कार्यपद्धतीनुसारच दहा समान मासिक व्याजरहित हप्त्यांमध्ये वसुली करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिका कामगार युनियन यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे सध्या देण्यात येणारी सणासाठी उचल १० हजार रुपये पुरेशी नसल्याने ती २० हजार इतकी करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
याबाबत माजी नगरसेवक सुधीर जानजोत यांनीदेखील पत्र दिले होते. महागाईत प्रचंड वाढ झालेली असल्याने सण साजरे करण्यास अडचण होत असल्याने चालू वर्षीपासून देण्यात येणारी सणासाठी उचल २० हजार रुपये करण्यात यावी, असे जानज्योत यांनी म्हटले होते. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. प्रस्तावात म्हटले आहे की, सेवक संख्या व प्रति सेवक १० हजार इतकी सणासाठी उचल विचारात घेऊन २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात १८ कोटी इतकी तरतूद केली आहे. १७,६०० करिता ३५ कोटी २० लाख रुपये तरतूद करणे आवश्यक ठरणार आहे.