पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढील आठवड्यात २६ सप्टेंबर रोजी पुणे दौरा होणार आहे. या दौऱ्यात जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन केले जाणार आहे. पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रोमार्गावरील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे आले असून, काही तांत्रिक परवानग्या बाकी आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांतच या मार्गावरदेखील मेट्रो धावू लागेल, अशी आजची स्थिती आहे.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा भूमिगत मेट्रोमार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल. त्यासंदर्भातील आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे काम महामेट्रोकडून वेगाने सुरू आहे. सहा किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट या स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. काही स्थानकांची नावे बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने मंजुरी दिलेल्या स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचे भूमिपूजनही याच वेळी होणार आहे. वनाझ ते रामवाडी मार्ग १०० टक्के पूर्णत्वाकडे गेला असून पुणेकर त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करत आहेत. पीसीएमसी ते स्वारगेट हा १७.५ किलोमीटर लांबीचा मार्ग ९० टक्के कार्यान्वित झाला असून त्यातील दिवाणी न्यायालय ते स्वारगेट मार्गाचे कामही वेगाने पूर्ण होत आहे.