पुणे : केंद्र सरकारतर्फे अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या जात आहेत. त्यात शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना फायद्याची ठरत आहे. या योजनेंतर्गत चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी २ हजार रुपयांची अर्थात वार्षिक ६ हजारांची मदत करण्यात येते. त्यानुसार, या योजनेचा १६ वा हप्ता राज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी (दि. २८) हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे ३ हजार ८०० कोटींचेही यावेळी वितरण होणार आहे. या हप्त्याच्या माध्यमातून १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना राबविली जात आहे.
या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रति हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात वार्षिक ६००० रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील १ कोटी १३ लाख ६० हजार शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यांमध्ये २७ हजार ६३८ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
पीएम किसान उत्सव दिवस होणार साजरा
पीएम किसान उत्सव दिवस बुधवारी केंद्र सरकारने २८ फेब्रुवारी हा दिवस देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा, तालुका व गावपातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र, सामाईक सुविधा केंद्रे या ठिकाणी हा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे यांनी दिली.
शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रक्कम होणार जमा
या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २८) यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरीत होणार आहे. तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरीत होणार आहे. पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याच्या १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण ८७ लाख ९६ हजार शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.