भिगवण (पुणे) : ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे! पक्षी ही सुस्वरे, आळविती!’ संत तुकाराम यांनी मानवाच्या जीवनामध्ये वृक्ष किती महत्त्वाचा आहे, हे गाथेमध्ये सांगितले आहे. निसर्ग हा मानवाला भरभरून देतो, त्यापरी मानव हा निसर्गाला काय देतो? म्हणूनच निसर्गाने केलेल्या उपकारांची परतफेड करण्यासाठी परिवर्तन युवा फाउंडेशन, भिगवण यांच्या वतीने भिगवणमध्ये असणारे अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली आहे.
भिगवण गावात वृक्षारोपण करण्यात परिवर्तन युवा फाऊंडेशन नेहमी आग्रही राहिले आहे. जास्तीत जास्त मोठे झाड लावून त्याचे संवर्धन करून अनेक ठिकाणी वृक्ष लावण्यात आले. यामुळे गावच्या सौंदर्यात भर पडली आहे. यासह याचा उपयोग उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना व माणसांना सावली उपयुक्त ठरत आहे. तुळजाभवानी मंदिर व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रा.तुषार क्षीरसागर, जावेद शेख, दादासाहेब थोरत, आकाश पवार, योगेश चव्हाण, किरण रायसोनी, सलमान शेख, अजिनाथ बंडगर, विठ्ठल भापकर, स्वप्निल थोरात आदी सदस्य उपस्थित होते.
‘झाडे तो लेकुरें आपुली! लेकरासारखी जपावी!’ असे छत्रपती शिवाजी महाराज यांनी झाडांप्रती आपले प्रेम व्यक्त केले होते. याच संकल्पनेतून “भविष्यात गावात घर तेथे वृक्ष ही संकल्पना राबवण्याचे धोरण राबवणार आहे. गावातील अरुंद रस्ते व वाढत चाललेले अतिक्रमण यामुळे अंतर्गत रोड लगत वृक्षारोपण करण्यासाठी अडचणी येत असल्याचे मत परिवर्तन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले.”