पुणे : पुणे जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) चालू वर्ष २०२४-२५ मध्ये अडीच हजार हेक्टरवर फळझाड लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी नोव्हेंबर महिनाअखेर ७५६.३६ हेक्टरवर म्हणजे उद्दिष्टाच्या ३० टक्के क्षेत्रावर फळझाड लागवड पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.
यंदा फळझाड लागवडीत शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल आंबा आणि नारळ पिकाकडे आहे. मनरेगातून फळझाड लागवडीसाठी तालुकानिहाय लक्षांक निश्चित केले आहेत. त्यानुसार भोर १६७ हेक्टर, वेल्हा ११०, मुळशी १३०, मावळ १८५, हवेली १८०, खेड १९२, आंबेगाव २११, जुन्नर २२३, शिरूर १९०, बारामती २४०, इंदापूर २३०, दौंड २२२, पुरंदर २२० हेक्टर मिळून अडीच हजार हेक्टरचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने क्षेत्रीय स्तरावर सूचना देऊन उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न सुरू असून, वेळोवेळी आढावा बैठकाही घेण्यात येत आहेत.
तालुकानिहाय झालेली फळझाडांची लागवड हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे :
भोर १२.१०, वेल्हा ४.५०, मुळशी २५.५५, मावळ ५.३०, हवेली २६.७५, खेड ७९.८९, आंबेगाव ९२.१०, जुन्नर ६८.११, शिरूर ६३.९०, बारामती ६७.७१, इंदापूर ७५.९५, दौंड ११९.९०, पुरंदर ११४.६० हेक्टरचा समावेश आहे. एकूण ८३३ शेतकऱ्यांकडून ७५६. ३६ हेक्टरवर फळझाडे लागवड पूर्ण झालेली आहे. तसेच, आंबा लागवडीत आंबेगांव ८९.०५ हेक्टर, खेड ६८.४४, दौंड ६७.३०, शिरूर ५०.९०, जुन्नर ४८.९५, पुरंदर ४१.४०, इंदापूर ४१.१५, बारामती १५, मुळशी १५, भोर १२.१०, हवेली ११.४५, मावळ ५.३० आणि वेल्हा तालुक्यात ३.५० हेक्टर इतकी सर्वात कमी फळझाडे लागवड झाली आहे.