पुणे: दिल्ली, मुंबई सारखे पुणे शहर हे आता मेट्रो पॉलिटन शहर झाले आहे. शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशाच्या वेगवेगळ्या भागांतून लोक येत आहेत. यामध्ये सर्वांत जास्त रेल्वेचा वापर होत आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाचा विकास होणे ही काळाची गरज आहे. त्याबरोबरच या स्थानकाची क्षमतादेखील वाढवावी लागणार आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाचा विकास टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले.
केंद्रीय रेल्वेमंत्री दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले होते. पुणे विभागासह पुणे रेल्वे स्थानकाची या वेळी त्यांनी पाहणी केली. या वेळी रेल्वे पुणे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुवे, तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता. पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी करीत अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. तसेच पुणे अहमदनगर लाईनच्या कामाचा या वेळी आढावा घेतला. तसेच पुणे-मुंबई दरम्यानच्या घाट सेक्शनमधील बँकर लावण्याची समस्या कशी सोडवता येईल, यासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून चर्चा केली.
उरुळी कांचनला करणार मेगा टर्मिनल
पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता ताण लक्षात घेता, परिसरातील स्थानकांचा विकास करणे आता आवश्यक झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर परिसरातील कोणत्या स्थानकाचा विकास करून त्याला मेगा टर्मिनल करता येईल, याबाबत चर्चा झाली. या चर्चेअंती उरुळी स्थानकाला मेगा टर्मिनल करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.