पुणे: पावसाळ्यात निसर्ग अधिकच खुलतो आणि अशा काळात धबधबे, धरणे, गडकिल्ले यांसारख्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. मात्र, या गर्दीमुळे अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

या बैठकीत प्रत्येक पर्यटनस्थळी एकावेळी किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा, याची संख्या निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले. ही अंमलबजावणी वन विभाग आणि स्थानिक प्रशासन मिळून करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी कुंडमाळा पुलावर मोठी दुर्घटना घडली होती. पुलावर एकाच वेळी अनेक पर्यटक जमा झाल्यामुळे पूल झुकला आणि काहीजण नदीत पडले. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

पर्यटनस्थळी प्रवेश मर्यादेबरोबरच, निश्चित शुल्क आकारणे, क्षेत्राचे सीमांकन, बॅरिकेट्सची व्यवस्था, आणि सुरक्षित जागा निश्चित केली जाणार आहे. तसेच, सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.
वन विभागाकडे पुरेशा सुरक्षा रक्षकांची संख्या नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना ‘पर्यटक मित्र’ म्हणून नेमण्यात येणार आहे. हे पर्यटक मित्र पर्यटकांना मार्गदर्शन करतील आणि सुरक्षिततेची जबाबदारी घेतील. त्यांना पर्यटन शुल्कातून मिळालेल्या निधीतून मानधन दिले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डड्डी यांनी दिली.







