पुणे : सोशल मीडियावर रिल्स तयार करण्यासाठी चक्क पिस्टल आणि राऊंड बाळगणाऱ्या चौघांना येरवडा पोलिसांनी अटक केले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. रोहन रमेश पवार (वय-१८, रा. पगडे वस्ती, चऱ्होली), अभिजित उमेश अवचरे (वय-१८, रा. पिसोळी, पुणे) व शाम संतोष गायकवाड (वय-१९, रा. झेंडेवाडी, पुरंदर) यांना अटक करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी येथील दत्त मंदिराच्या मागे दोन संशयित तरुणाकडे देशी बनावटीचे पिस्टल असल्याची गोपनीय माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार तुषार खराडे, पोलीस अंमलदार सुशांत भोसले आणि सुरज ओंबासे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे तात्काळ तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना घटनास्थळी पाठवून संबंधित संशयीतांना ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालकाचा देखील समावेश आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक राऊंड जप्त करण्यात आले.
अधिक तपास केला असता हे सर्व तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी असून सोशल मीडियावर पिस्टलसह रील तयार करून दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, तीन आरोपींची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील करत आहेत.