पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील बेनकर वस्ती, लायगुडे वस्ती, महादेव मंदिर परिसराच्या पाणी टंचाईग्रस्त भागात नवीन जलवाहिन्या टाकण्यास प्रशासनाने अखेर मंजुरी दिली आहे. धायरी परिसरातील तीव्र पाणीटंचाईकडे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी लक्ष वेधले होते. त्यांच्या मागणीला यश मिळाले.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, उर्वरित धायरी व परिसराचा पालिकेत समावेश होऊनही या भागातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी आक्रोश करावा लागत आहे. पाणीटंचाईमुळे पालिकेच्या मोफत टँकरपेक्षा खासगी टँकरची मागणी दुपटीने वाढली आहे. सोसायटी, लोकवस्त्यांतील रहिवाशांना टँकरसाठी दरमहा जादा पैसे द्यावे लागत आहेत.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लायगुडे वस्ती, बेनकरवस्ती, रायकरमळा, अंबाईदरा, पोकळे वस्ती, धनगरवस्ती आदी परिसरातील पाणी पुरवठा कोलमडला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रचंड लोकसंख्येला पुरेसे पाणी मिळत नाही. अपुऱ्या, कमी व्यासाच्या जलवाहिन्या, अनियमित व कमी दाबाने पाणी, उंच भागात पाणीटंचाई आदी समस्यांना रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिक रोजच्या पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. माहिती अधिकारामध्येसुद्धा महानगरपालिकेला याबाबत प्रश्न विचारले होते. त्यामुळे जलवाहिनी टाकण्यासाठी त्वरित तातडीने पैसे मंजूर झाले आहेत. पाणीपुरवठ्याचा सुधारित आराखडा मंजूर होऊन प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.