लहू चव्हाण
पाचगणी : थंड हवेचे ठिकाण आणि महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या पाचगणीचे सौंदर्य खुलून आले आहे. येथील सर्वच रस्ते धुक्यामध्ये हरवून गेले आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक पाचगणीच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येथे येतात. डिसेंबर महिना सुरू झाला आहे. वातावरणात गुलाबी थंडीचा अनुभव पाचगणीमध्ये पर्यटकांना चांगलाच अनुभव देत आहे. महाबळेश्वर पाचगणी परिसरातील सर्व पर्वतरांगा सूर्योदयानंतर पांढऱ्या शुभ्र दाट धुक्यांनी न्हावून निघतात, जणू बर्फाच्छादित पर्वत रांगा असल्याचा अनुभव पर्यटकांना येतो. पाचगणीच्या दाट धुक्यामध्ये पाचगणीतील सर्व पॉईंटस् हरवून जातात. हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.
महाबळेश्वर-पाचगणी येथे आज पहाटे हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली त्यामुळे हवामानात बदल होऊन ढग पाचगणीच्या निसर्गात एकरूप झाल्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना आणि स्थानिकांना पाहायला मिळाले. पाचगणी शहरावर ढगांचे लोट स्वार होऊन पसरले आहेत. यामुळे जणू काश्मीर असल्याचा भास होत आहे.
सध्या पाचगणी शहरात ‘आय लव्ह पांचगणी’ फेस्टिवलला धुमधडाक्यात सुरुवात झाली असून, हजारो पर्यटक शहरात दाखल झाले आहेत.आज सकाळी स्थानिकांसह पर्यटकांनी पाचगणीचे काश्मीर झाल्याचे विहंगम दृश्य पाहिले. हे दृश्य मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह पर्यटकांसह स्थानिकांनाही आवरता आला नाही. सर्वत्र पांढरे शुभ्र आभाळ धरतीवर उतरण्याचा आभास होतोय. यातच सोनेरी सूर्यकिरण या धुक्याचं सौंदर्य वाढवत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर सिलसिला चित्रपटातील एक गाणं अलगद ओठांवर येते, ये कहा आ गये हम, युही साथ साथ चलते…