Pune News : पुणे : गोकुळाष्टमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. उंचावरील दहीहंडी फोडणे, हे या सणाचे खास आकर्षण असते. गेली काही वर्षे पुरुषांबरोबरच महिला पथकेही दहीहंडी फोडण्यासाठी सहभाग घेत आहेत. यंदा या उत्सवात तृतीयपंथीयही सहभागी होणार आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार आहे. आज तृतीयपंथी देखील विविध क्षेत्रांत काम करताना दिसत आहेत. ही चांगली बाब असून, समाजाने त्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे स्वीकारले पाहिजे, या हेतूने यंदा प्रथमच तृतीयपंथीयांचे गोविंदा पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तृतीयपंथीयांचा सहभाग असलेले १०० जणांचे तब्बल चार संघ पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये तयार करण्यात आले असून, त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे.
चार पथकांची स्थापना
तृतीयपंथीयांच्या प्रत्येक संघात २५ सदस्यांचा सहभाग असणार आहे. येत्या सात सप्टेंबरला पुण्यातील नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहीहंडी फोडण्यात येणार आहे. (Pune News) ‘दीपस्तंभ’चे विश्वस्त आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सामाजिक कार्यकर्त्यां शर्वरी गावंडे आणि शिवप्रताप संस्था यांच्या माध्यमांतून तृतीयपंथी यांच्या दहीहंडीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
जवळपास १०० तृतीयपंथी एकत्रित आले असून, हे दहीहंडी फोडण्यास सज्ज झाले आहेत. यामधून समाजाला एक संदेश जाण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया दीपक मानकर यांनी यावेळी दिली. या वेळी बोलताना तृतीयपंथी कादंबरी म्हणाल्या की, आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत आहे, हे पाहून आनंद वाटतो. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने तृतीयपंथीयांना सुरक्षारक्षक होण्याचा मान दिला. आम्हाला मुख्य प्रवाहात येण्यास यातून मदत झाली आहे. (Pune News) आजपर्यंत अनेक सण उत्सवांमध्ये आम्ही सहभागी होत नव्हतो. पण आता गोविंदा पथकात सहभागी होण्यास मिळत आहे, हे पाहून छान वाटते.
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथी यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्यापैकीच हा एक निर्णय आहे. (Pune News) याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी सर्वांना विशेष प्रशिक्षण दिले असून, या दहीहंडीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून देखील दखल घेतली जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यां शर्वरी गावंडे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दिवे घाटात बिबट्याचे भरदिवसा रस्त्यावर ठाण; वाहनचालकांची तारांबळ
Pune News : ‘रियटर’च्या कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बेमुदत उपोषणाचा इशारा