पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढ होत असून, गृहनिर्माण संस्थांचे जाळे विकसित होत आहे. शहराची लोकसंख्या २७ लाखांवर पोहोचली आहे. परिणामी पाण्याची गरज वाढत आहे. पाण्याची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी बहुतांश गृहनिर्माण संस्थांना वर्षभर खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. सोसायट्यांनी टॅंकरचे पाणी घ्यावे, यासाठी शहरातील पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव भागात टँकर माफिया महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यास भाग पाडत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या टँकर माफियांना काही भागांत राजकीय वरदहस्त असल्याचीही चर्चा आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रतिदिन पवना धरणातून ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी), चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून ७० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून १३ असे ५९३ दशलक्ष लिटर पाणी उचलते. यापैकी ४० टक्के पाणीगळती व पाणी चोरी होत असल्याचे प्रशासनाने गेल्या पाच वर्षांपासून निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.
या प्रकारामुळे मागील चार वर्षांपासून एक दिवसाआड तोही अनियमित, अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशी पाण्यासाठी टँकरचा आधार घेतात. मानकाप्रमाणे प्रतिदिन प्रतिमाणसी १३५ लिटरप्रमाणे पाणी देणे बंधनकारक आहे. परंतु, महापालिकेकडून दिवसाआड आणि कमी वेळ पाणी सोडले जाते. दरम्यान, टँकर लॉबीसाठी राजकीय दबावातून हा प्रकार होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक भागांमध्ये टँकरमाफियांनी पाण्याच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची माया कमविल्याची चर्चा सातत्याने होत आहे. टॅंकर माफियांच्या भल्यासाठी ही पाणी टंचाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. याचा आर्थिक भुर्दंड संस्थांना सहन करावा लागत आहे.
‘कोणाचाही दबाव नाही’
पाणी सोडण्याच्या वेळा ठरल्या असून, त्यानुसार पाणी सोडले जाते. कोणाच्या सांगण्यावरून कमी दाबाने पाणी सोडले जात नाही. छोट्या १३५, तर मोठ्या संस्थांमधील रहिवाशांना ९० लिटरप्रमाणे प्रतिदिन प्रतिमाणसी पाणी दिले जाते, असे मत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी व्यक्त केले.
बाराही महिने खासगी टँकरचे पाणी
पिंपरी-चिंचवड महापालिका एक दिवसाआड पाणी देते. तेही कमी दाबाने आणि कमी वेळ येते. त्यामुळे प्रतिदिन प्रतिमाणसी १३५ लिटरची गरज पूर्ण होत नाही. एका सदनिकेत पाच माणसे राहत असतील तर त्यांना पाणी पुरत नसल्याने बाराही महिने खासगी टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, असे मत पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशनचे उपाध्यक्ष सचिन लोंढे यांनी व्यक्त केले.