पिंपरी : मावळ तालुक्यातील कासारसाई धरणात पोहायला गेलेला एक तरुण बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (दि. २२) दुपारी ही घटना घडली. त्याचा मृतदेह मंगळवारी (दि. २३) सकाळी बाहेर काढण्यात आला. माधव हरगौरी सिंग (वय-१७, रा. नाशिक एमआयडीसी) असं बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माधव सोमवारी दुपारी कासारसाई धरणात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. सोमवारी सायंकाळी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ या संस्थेचे सदस्यांनी शोधकार्य सुरू केले. मात्र सायंकाळी अंधार झाल्याने शोधकार्यात अडथळे येऊ लागले. त्यामुळे सोमवारी सायंकाळी शोधकार्य थांबवण्यात आले.
मंगळवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले. सकाळी साडेनऊच्या सुमारास माधव याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. नीलेश गराडे, अनिल आंद्रे, विनय सावंत, शुभम काकडे, आवी कारले, प्रथमेश सुपेकर, रमेश कुंभार, कुणाल दाभाडे, वैभव वाघ यांनी शोधकार्यात सहभाग घेतला.