पिंपरी चिंचवड : माझ्या गर्लफेंडला शिवी का देतोस, असे म्हणत तरुणाला शस्त्राने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील मोहननगर परिसरात घडली आहे.
अभिजित महादेव खाडप (वय 22, रा. पवार वस्ती, ताथवडे) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने शुक्रवारी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चैतन्य राठोड (वय 20, रा. फुलेनगर झोपडपट्टी, मोहननगर, चिंचवड) आणि जय (पूर्ण नाव माहिती नाही, रा. गाय वासरू चौक, मोहनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजित खाडप हा शुक्रवारी दुपारी मोहनगर येथील गाय वासरू चौकात थांबला होता. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी आपसांत संगनमत करून गर्लफेंडला शिवी का देतो, असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ करीत शस्त्राने त्याच्यावर मारहाण केली. आरोपी राठोड याने त्यांच्या जवळील चाकू सारख्या हत्याराने फिर्यादीच्या छातीच्या खाली, हातावर व डोक्यावर वार करीत जखमी करून तिथून पळ काढला.
या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.