पिंपरी : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागात लहान भावाने मोठ्या भावाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार गुरुवार (दि.22) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास खेड तालुक्यातील आळंदी येथे घडला. महादेव देवकाते असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव याने मोठा भाऊ महेश देवकाते याला दारूसाठी १ हजार रुपये मागितले होते. महेश याने पैसे देण्यास नकार दिल्याने महादेव याने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. यात महेश गंभीर जखमी झाला. त्यानंतर मारहाणी प्रकरणी महेश यांने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महादेव याच्यावर आयपीसी 307, 504, 506 सह क्रिमीनिल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश देवकाते हे आळंदी गावच्या हद्दीतील संदिप कायस्थ यांच्या फुलांच्या दुकानावर काम करीत होते. गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास महेश याचा लहान भाऊ महादेव हा दुकानात आला. त्याने महेश याच्याकडे दारु पिण्यासाठी एक हजार रुपये मागितले. मात्र, महेश याने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने त्याच्या जवळील लोखंडी रॉड महेश याच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आळंदी माऊली मंदिर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करुन लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साळी करीत आहेत.