पिंपरी-चिंचवड : चाडी सांगत असल्याचा राग मनात धरून तिघांनी मिळून एका महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपींपैकी एकाने डोक्यात दगड मारून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमधील केशवनगर परिसरात घडली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात आरोपी विजय भगवान जाधव (रा. पाग्याची तालीम, केशवनगर, चिंचवड) आणि दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवार, २१ जून रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास केशवनगर येथील पाग्याची तालीम शाळेजवळ आपल्या घरासमोर उभी असताना आरोपी विजय भगवान जाधव आणि दोन महिलांनी तिला अडवून शिवीगाळ केली.
चाडीचा राग मनात धरून हल्ला
फिर्यादी आरोपी १ हिच्या पतीबाबत काही चाडी सांगते, असा संशय मनात धरून तिघांनी मिळून हल्ला केला. आरोपी ३ हिने फिर्यादीच्या केसांना पकडून हाताने मारहाण केली. त्याचवेळी आरोपी १ हिने तिचे दोन्ही हात पकडून ठेवले आणि आरोपी २ ने शेजारी पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारून तीला गंभीर जखमी केलं.

या प्रकरणी आरोपी विजय भगवान जाधव (रा. पाग्याची तालीम, केशवनगर, चिंचवड) आणि दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.







