पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील तळेगाव दाभाडे परिसरात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना सोमवारी १३ मे रोजी तळेगाव दाभाडे येथील भंडारा दर्शन कॉलनी येथे घडली.
याप्रकरणी मयत मुलीच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पती विराज मोहन अवघडे (वय-२४, रा. तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे. तसेच विराज याचे वडील मोहन अवघडे आणि आई यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी प्रियंका हिचा विवाह २०२० साली विराज याच्याशी झाला होता. मात्र, विराज याने प्रियंकाचा वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत छळ केला. सासू-सासरे यांनी कोणतीही मदत न करता मुलाच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले. या त्रासाला कंटाळून प्रियंकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.