पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात काळेवाडी येथे बिअरच्या बाटलीने पत्नीवर वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीला मारहाण केली. तसेच बियरची बाटली फोडून तिच्यावर वार केले. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली. काळेवाडी येथील आदर्शनगरमध्ये सोमवारी ८ एप्रिल ला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
अजय मधुकर दाणे (२६, रा. आदर्श नगर, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माधुरी अजय दाणे उर्फ माधुरी विष्णू पांचाळ (वय २५) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधुरी आणि त्यांचे पती अजय यांच्यात कौटुंबिक कारणावरून भांडण झाले. त्यावेळी पती अजयने शिवीगाळ करीत लाकडी बेलण्याने डोक्यात मारहाण केली. तसेच माुधरी यांना चावा घेऊन जखमी केले. खोलीत असलेली रिकामी बिअरची बाटली फोडून त्यांच्या तोंडावर, गळ्यावर वार केले. यात माधुरी गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी महिलेनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पतीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.