पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील मोशी परिसरात एक धक्कदायक घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून लोखंडी रॉड डोक्यात मारून पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १० मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सिल्व्हर करिष्मा बिल्डींग समोर, शिवाजी वाडी मोशी येथे घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पती फरार झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
जयश्री मारुती बाबान्ना (वय-४७ रा. सिल्व्हर करिष्मा बिल्डिंग समोर शिवाजीवाडी, मोशी) असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत जयश्री यांचा मुलगा बालाची मारुती बाबान्ना (वय-२९) याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून मारुती चंद्राप्पा बाबान्ना (वय ५० रा. सिल्व्हर करिष्मा बिल्डिंग समोर शिवाजी वाडी, मोशी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी बालाजी याला दारु पिण्याचे व्यसन आहे. यावरुन फिर्य़ादी यांची आई आणि वडिल यांच्यात सतत वाद होत होते. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपीने पत्नीकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पठारे करीत आहेत.