Water Supply Off | पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी असल्याने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून (गुरुवार) होणार आहे. तसेच पाणीपुरवठा बंद ठेवण्याबरोबरच पाणी बचतीसाठी टँकर केंद्रही बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता पाणीसाठा करत पाणी जपून वापरावे लागणार आहे.
यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज…
तीव्र उन्हाळा असल्याने बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासोबतच यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पाणी जपूनच वापरावे लागणार आहे.
दरम्यान, दर गुरुवारी बंद ठेवल्यास एका महिन्यात ०.२५ अब्ज घनफूट पाण्याची बचत होते. त्यानुसार पंधरा टक्क्यांपर्यंत पाणीकपात असेल, असा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.
शहराला खडकवासला साखळी प्रकल्पातील वरसगांव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणात केवळ ८.८६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. त्यातच ग्रामीण भागासाठी सिंचनाचे आवर्तनही सुरू ठेवण्यात आले आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद…
हवामान विभागाचा अंदाज आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आठवड्यातून एकदा म्हणजे दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून उद्यापासून (१८ मे) या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
शहराची तहान भागविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दररोज १ हजार ४०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी धरणातून उचलण्यात येते. महापालिका हद्दीत नव्याने २३ गावांचा समावेश झाल्याने या गावांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. प्रतिदिन १ हजार ४०० दशलक्ष लिटर पाणी घेण्यात येत असतानाही शहराच्या अनेक भागात सध्या विस्कळीत, अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्याबाबतच्या शेकडो तक्रारी महापालिका प्रशासनाकडे येत आहेत.
टँकरच्या फेऱ्यांमध्ये सहा हजारांनी वाढ…
बाणेर, बालेवाडी या भागातील अनेक सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून हडपसर, महंमदवाडी, उरूळी देवाची, फुरसुंगी या गावे पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीतही वाढ झाल्याने टँकरच्या फेऱ्यांमध्येही सहा हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागात सध्या पाणीटंचाई जाणवत असून या परिस्थिती गुरुवारपासून आणखी तीव्र होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune News | आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून घातला कोट्यवधीचा गंडा