पिंपरी चिंचवड : राज्याभरासह पुण्यातही पावसाने दमदार हजेरी लावलेली दिसून येत आहे. मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे पिंपरी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराजवळील पवना नदी दुथडी भरुन वाहत असल्याने परिसरात पाणी साचले आहे.. पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
आयएमडी ने पुणे, सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. कोयना धरणक्षेत्रामध्ये तसेच पुण्यात खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या मधून विसर्ग सुरू केला जात आहे.
पवना धरण क्षेत्राखालील भागामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे पवना नदीची पातळी वाढली. पवना नदीचे पाणी चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिरात शिरले. त्यामुळे मंदिराचा परिसर जलमय होऊल गेला. पुणे, पिंपरी – चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.