पिंपरी : वाकड, ताथवडे या परिसरात गेल्या पाच वर्षांपासून विजेचा लपंडाव सुरू असून रहिवासी त्रस्त झाले आहेत. या परिसरात गेल्या १२ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण रहिवासी संकुलांची संख्या वाढली आहे. परिसरात आयटीयन्सचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, येथे गेले ५ वर्षांपासून विजेचा लपंडाप सुरु आहे. त्यामुळे आयटी कर्मचारी बेजार झाले असून, सर्वसामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
महावितरनाने हा विषय त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी येथील रहिवासी असलेल्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. दिवसाला ३-४ तास रोज हा लपंडाव सुरु आहे. परिणामी अनेकदा वाकड, ताथवडे रहिवासीयांना घरून काम करण्याची मुभा असून देखील केवळ विजेअभावी त्यांस कार्यालयात जाणे भाग पडत आहे. तर दिवसाला संपूर्ण संकुलावर जेनेरेटरला लागणाऱ्या डिझेलसाठी पैसे खर्च करण्याची वेळ देखील त्यांच्यावर आली आहे.
पिंपरी-चिंचवड हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून महावितरणासोबत गेली अनेक वर्षे बैठका घेतल्या. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. महावितरण अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार महावितरणच्या विद्युत उपकारणांमध्ये पावसाळी ओलाव्यामुळे हा लपंडाव सुरु आहे आणि तो कमी करण्यासाठी विद्युत प्रवाह २२kv वरून ११kv वर आणणे गरजेचे आहे.
– सचिन लोंढे, संस्थापक, पिंपरी चिंचवड कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.