पिंपरी, (पुणे) : पिंपरी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेलमधल्या दारूच्या बाटल्या चोरून नेत असताना वेटरने त्याला विरोध केला. त्यामुळे तरुणाने वेटरवर चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. या झटापटीत वेटर गंभीर जखमी झाला आहे. देहूगाव येथील एम. एस. हॉटेलमध्ये शनिवारी २७ जानेवारीला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
इंद्रजीत बालाजी डुकरे (२९, रा. देहूगाव) असं जखमी वेटरचे नाव आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनू उर्फ आशितोष दिगंबर एकलारे (२२, रा. देहूगाव) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी इंद्रजीत आणि सोनू हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सोनू याने इंद्रजीत काम करत असलेल्या हॉटेलमधून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेत होता. हा प्रकार इंद्रजीत याने पाहिला. त्याने सोनूला चोरलेल्या दारूच्या बाटल्या बाहेर घेऊन जाण्यास विरोध करत त्याला जाब विचारला. या कारणावरून सोनू याने इंद्रजीत याच्यावर हॉटेलमधील चाकू घेऊन सपासप वार केले. यामध्ये इंद्रजीत गंभीर जखमी झाला आहे.