पिंपरी चिंचवड : येथील दापोडीमध्ये अतिक्रमण कारवाई करताना पथकातील महिला सुरक्षारक्षकांनी भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करणा-या महिलेचा भाजीचा गाडा जप्त करण्याची कारवाई करत असताना झालेल्या वादातून महिला सुरक्षा रक्षक संबंधित महिलेला मारहाण करत आहेत. तसेच महिलेला मारहाण करत तिला जमिनीवर ढकलून दिले आहे. यावेळी ती महिला आरडाओरड करत राहिली तरीही महिला सुरक्षा रक्षकांनी तिला मारहाण करण्याचे थांबवली नाही, या व्हायरल व्हिडिओमध्ये हे दृश्य दिसत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे हॉकर्स धोरण अद्यापही कार्यरत होत नसल्याने अनेक पथारी धारक रस्त्याच्याकडेला भाजी आणि इतर वस्तू विकत असतात. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने असे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने पथक नेमले आहे. ज्यामध्ये एमएसएफ (MSF) जवानांचा समावेश करण्यात आला आहे.
सध्या शहरातील काही भागात या जवानांमार्फत अतिक्रमण कारवाई सुरु आहे. मात्र अशी कारवाई करत असताना अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना मारहाण करता येत नाही तरी देखील अशा प्रकारची मारहाण केली गेल्याने आता महापालिका प्रशासन काय कारवाई करेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मारहाणीचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.