पुणे : बारामती लोकसभेवरून अजित पवार गट विरुद्ध माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. या टीकेला मावळमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिलं आहे. विजय शिवतारे यांनी अजित पवारांची माफी मागावी, अन्यथा पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरून जाऊ न देण्याचा थेट इशारा दिला आहे. मावळमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
बारामती लोकसभेला महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. अशातच आता माजी मंत्री विजय शिवतारे हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी तशी इच्छादेखील व्यक्त करत बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच यावर विजय शिवतारे ठाम आहेत. ते बंडखोरी करून निवडणूक लढवण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवतारे हे आक्रमक झाले आहेत. ते अजित पवारांवर सतत टीका करताना दिसत आहेत. यावर अद्याप अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली नाही. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले असून पुण्यातील मावळमधील कार्यकर्त्यांनी विजय शिवतारे यांना पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरून जाऊ न देण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही महायुतीचा धर्म पाळत आहोत. मात्र, शिवतारे हे अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेत असून त्यांना आम्ही जशासतसे उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.