पिंपरी- चिंचवड, (पुणे) : पिंपरी-चिंचवडमधील दोन तरुणांना स्टंटबाजी करणं चांगलंच अंगलट आलं आहे. या तरुणांचा स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून हा तरुण स्टंटबाजी करताना व्हिडिओमध्ये दिसत होता. या दोन स्टंटबाजला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्याकडून कारदेखील जप्त केली आहे. प्रतीक शिंगटे आणि ओमकार मुंडे अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, प्रतिक शिंगटे हा चिकन आणि वडापाव सेंटर चालवितो. तर, ओमकार मुंढे हा निगडी पोलीस लाईनमध्ये राहत आहे. हे दोघेही गुरुवारी १५ फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजता चिंचवड येथील केएसबी चौकामध्ये वेगाने कार चालवत स्टंटबाजी करत होते. शिंगटे हा कार चालवत होता. तर मुंढे हा कारच्या छतावर बसून स्टंटबाजी करत होता. त्यामुळे रस्त्यावरील इतरांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशी परस्थिती निर्माण झाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने या दोन्ही तरुणांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. भरधाव वेगात असलेल्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून तरुण स्टंटबाजी करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पिंपरी- चिंचवड शहरातील असून तरुणावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. या व्हिडीओत अत्यंत बिनधास्तपणे हा तरुण गाडीच्या टपावर बसलेला दिसत होता.
त्याला कसलीच भीती वाटत नाही, असं व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओच्या आधारे तरुणाचा शोध घेऊन त्यावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली होती. अशा पद्धतीने कोणीही स्टंटबाजी करू नये असं आवाहन ही पोलिसांनी केलं होतं. अखेर त्या स्टंटबाजीचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.