पुणे : मावळ मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांना, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संज्योग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच आता शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मावळ तालुक्यात शिवसेना ‘उबाठा’ला मोठे खिंडार पडले आहे. तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तसेच नेत्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
काळेवाडीत आज शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचा मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. खासदार बारणे यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. ‘उबाठा’ गटाचे मावळ उपतालुकाप्रमुख आणि माजी सरपंच चंद्रकांत भोते, ओव्हळे गावचे विद्यमान उपसरपंच समीर कराळे, उबाठा शाखाप्रमुख विजय भोते, माजी सरपंच मनोहर भोते, गणेश भोते, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोते, नवनाथ भोते, उबाठा परंदवडी शाखाप्रमुख विकास जगदाळे, गणेश भोते, कचरेवाडी येथील संतोष कचरे, मधुकर कचरे, रामदास कचरे आदींसह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.
मावळमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार आहे. त्यात संज्योग वाघेरे (शिवसेना, ठाकरे गट) विरुद्ध श्रीरंग बारणे (शिवसेना, शिंदे गट) अशी लढत होणार असून दोन्ही उमेदवारांकडून प्रचारासाठी आणि जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. रोज गावभेटी दौरे तसेच सभांचा धडाका सुरु आहे. अशातच आता अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.